

जाफराबाद ः एकेकाळी उन्हाळा सुरू झाला की जाफराबाद शहरासह तालुक्यातील चौकाचौकांत पाणपोई उभारल्या जात होत्या. प्रवाशांची तहान भागवण्यासाठी दानशूर संस्था, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत असत. मात्र बदलत्या काळात ‘बाटलीबंद संस्कृती’ने या पाणपोईंचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे.
आज परिस्थिती अशी झाली आहे की, सर्वसामान्यांची तहान भागवण्यासाठी खिशाला झळ बसत आहे. बाजारपेठ, बसस्थानक, शासकीय कार्यालय परिसर किंवा शाळा-महाविद्यालयांच्या आसपास थंड पाण्याऐवजी आता प्लास्टिकच्या बाटल्या दिसतात. विकतचे पाणी घेणे हीच जणू फॅशन बनली आहे.
पूर्वी एखाद्या संस्थेच्या नावाने उभारलेली पाणपोई ही केवळ पाणीपुरवठ्याची सोय नव्हती, तर सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होती. रमजान, यात्रोत्सव, आषाढी वारी, गणेशोत्सव यावेळी मोठ्या प्रमाणावर पाणी वाटप केले जात असे.
आता मात्र त्या परंपरेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. “तहान ही मानवी गरज आहे, फॅशन नाही,” अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. आता बाटलीबंद पाण्याच्या वाढत्या वापराला लगाम लावून दानशूर परंपरा पुन्हा जिवंत होणार का, याकडे शहरासह तालुत्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
वारसा जपण्याची गरज
प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रस्त्यांवर, नाल्यांमध्ये फेकलेल्या रिकाम्या बाटल्यांमुळे अस्वच्छता वाढत आहे. दुसरीकडे, दानशूर संस्थांचा सामाजिक वारसा जपण्याऐवजी व्यापारीकरणाला चालना मिळत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
मोफत पाण्याची व्यवस्था करावी
जाफराबाद तालुक्यात पुन्हा एकदा पाणपोई संस्कृतीला बळ द्यावे, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि प्रशासनानेही सार्वजनिक ठिकाणी मोफत शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.