

आन्वा ः भोकरदन शहरासह बाजारपेठेत विविध आंब्यांच्या जातींची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने सध्या आंबा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. हापूस, केशर, दशहरी, तोतापुरी, बदामी, नीलम आणि लालबाग या आंब्यांच्या जातींनी बाजार सजला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.
सध्या बाजारपेठेत हापूस आणि केशर आंबा सुमारे 200 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे, तर लालबाग आंबा 150 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे.
दशहरी, तोतापुरी, बदामी आणि नीलम या आंब्यांनाही बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः आमरस तयार करण्यासाठी या जातींची खरेदी वाढली आहे. लालबाग आंबा सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने त्याची मागणीही टिकून आहे.
पूर्वी गावरान आंब्याची उत्सुकतेने वाट पाहिली जात होती. मात्र, आता बाजारात विविध जाती सहज उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची प्रतीक्षा काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीही गावरान आंब्याची चव वेगळी असल्याने त्याची मागणी कायम आहे. मात्र, यंदा गावरान आंबे चांगलेच आले आहेत. परंतु उशिरा गावरान आमरस चाखण्याची संधी मिळणार आहे.
अक्षय तृतीयेला गावरान आमरस मिळालाच नाही
यंदा गावरान आंब्यांची फळधारणा उशिरा होत असल्याने अक्षय तृतीयेच्या सणाला गावरान आमरस उपलब्ध झाला नाही. त्यामुळे अनेक नागरिकांनी आतापासूनच हापूस व दशहरी आंब्यांची खरेदी करून आमरस तयार करण्याकडे कल आहे.