भोकरदन : तालुक्यातील जैनपूर कोठारा शिवारात गाडीचे डंपर फोडल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर लोखंडी काठी व लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात ४ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रत्नाकर एकनाथ जोशी या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, १५ ऑक्टोबर रोजी ते सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताजवळील जात असताना आरोपी काशीनाथ देवराव जोशी, भिक्का आप्पा जोशी, हरीदास आप्पा जोशी आणि नारायण आप्पा जोशी यांनी संगनमत करून रत्नाकर जोशी यांना अडवले..तू माझ्या गाडीचे डंपर का फोडले? असे विचारत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर भिक्का आप्पा जोशी याने त्यांना धक्काबुक्की केली, तर हरिदास आप्पा जोशी याने जमिनीवर पडलेली काठी हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. आरोपी काशीनाथ जोशी व नारायण जोशी यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रकरणांमध्ये फिर्यादी रत्नाकर एकनाथ जोशी यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास हवालदार दाभाडे करत आहेत.