Chhatrapati Sambhajinagar Water Supply : सातारा देवळाईसह नो नेटवर्क भागांना नवीन वर्षात पाणी

मनपाचे नियोजन, १४ जलकुंभांची वितरण व्यवस्था करणार सक्षम
 Water Supply
Water Supplypudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत सातारा-देवळाईसह अद्याप वितरण व्यवस्था पूर्ण न झालेल्या नो-नेटवर्क भागातील नागरिकांना नवीन वर्षात पाणीपुरवठा सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. यासाठी १४ जलकुंभांशी संबंधित वितरण वाहिन्यांमधील अपूर्ण जोडण्या शोधून त्या पूर्ण केल्या जाणार आहेत. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर जलवाहिन्यांची चाचणी घेऊन नळजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती शुक्रवारी (दि. १६) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सातारा-देवळाईसह शहरातील नो-नेटवर्क भागांना नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाण्याच्या वितरणासाठी १४ जलकुंभांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या जलकुंभांच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत वितरण वाहिन्या टाकताना काही ठिकाणी जोडण्या अपूर्ण राहिल्या आहेत. दोन ते तीन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या या वाहिन्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी काही भागांत नव्याने जलवाहिन्या टाकण्याची गरज आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संयुक्तपणे कामाचे नियोजन केले आहे. यात वितरण वाहिन्यांमधील अपूर्ण जोडण्या वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 Water Supply
SSC HSC Exam 2027 : आता 'झोन पद्धती' : 'होम सेंटर' होणार बंद

सध्या या कामासाठी ३०० मजूर कार्यरत असून, त्यात आणखी २०० मजुरांची भर घातली जाणार आहे. त्यामुळे ५०० मजूर केवळ वितरण वाहिन्यांमधील गॅप शोधणे आणि जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. या वाहिन्यांमधील त्रुटी दूर केल्यानंतर त्यामधून पाणी सोडून तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहिन्यांची स्वच्छता करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवीन नळजोडण्या देण्यात येणार आहे.

या कामासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याने सातारा-देवळाईसह नो नेटवर्क भागात नवीन वर्षात पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे १०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी संबंधित वाहिन्या बदलण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. त्यामुळे एकीकडे वितरण वाहिन्यांमधील अपूर्ण जोडण्या पूर्ण करणे, दुसरीकडे दूषित पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून जुन्या वाहिन्या बदलणे आणि त्यानंतर नेटवर्क भागातील उर्वरित कामे मार्गी लावणे, अशा टप्प्यांतून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे सातारा-देवळाईसह नो-नेटवर्क भागातील नागरिकांना नवीन वर्षात नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 Water Supply
Bus Staff Accommodation Problems : काहींना आरामांची सुविधा, काहींचा बसमध्येच मुक्काम

६६७ किलोमीटरच्या वाहिन्यांचे काम

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात १,९०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी सुमारे १,२०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नियोजनातील नेटवर्क भागात आणखी ६६७ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र, प्रथम नो-नेटवर्क भागातील वितरण व्यवस्था पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी सध्या कार्यरत असलेले मजूर या भागातील कामासाठी वळविण्यात येतील. तेथील काम पूर्ण झाल्यानंतर हेच मनुष्यबळ पुन्हा नेटवर्क भागातील जलवाहिन्या टाकण्याच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.

नळजोडणीसाठी सहा हजार रुपये शुल्क

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना महापालिकेमार्फत नळजोडण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नळजोडणीकरिता सहा हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क भरल्यानंतरच नळजोडणी देण्यात येणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news