

बदनापूर ( जालना ) : बदनापूर-चिखली रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यासोबतच रस्त्यांच्या दुतर्फा नाले तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम केवळ कागदावर दाखवण्यासाठी की नागरिकांची सोय व्हावी यासाठी? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण, ठेकेदाराकडून नाल्यांचे काम घाईगडबडीत व अर्धवट पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच साचू लागले आहे.
पावसाळ्यात नागरिकांना दररोज पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढावा लागतो आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस पडलेले मातीचे ढिगारे आणि अर्धवट तयार करण्यात आलेले नाले यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एवढे असूनही प्रशासन आणि ठेकेदार डोळेझाक करत असल्याची टीका नागरिक करत आहेत. कामे कासवगतीने, तीही अर्धवट; मग लोकांनी त्रास सहन करावा का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन अर्धवट नाल्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चिखली या मार्गावरील नाल्यांचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे, पण गती मात्र कासवासारखी ! ऐन पावसाळ्यात अर्धवट कामे टाकून ठेवण्यात आली आहेत. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून चिखल, दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाणे कठीण झाले असून, नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
अवचित जऱ्हाड, नागरिक
लोकप्रतिनिधी फक्त भाषणांत विकासाच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात नागरिकांचे हाल बघायलाही तयार नाहीत. ठेकेदाराच्या गैरजबाबदारपणावर कारवाई करणे सोडाच, उलट प्रशासन आणि नेते त्याला पाठीशी घालतात. असा आमचा रोखठोक आरोप आहे.
ऋषिकेश थोरात, नागरिक