

Attack for not lending fireworks
परतूर, पुढारी वृत्तसेवा : फटाके उधार कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने फटाके दुकानंदारांना हातातील तलवारीने जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याने फटाका बाजारात खळबळ उडाली. या प्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रामेश्वर बाबासाहेब उबाळे (रा. उबाळे गल्ली परतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की २० ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोंढा भागातील फटाका मार्केट येथे ओंकार लिंबाजी माने यांच्या दुकानात फटाके घेण्यासाठी गेलो असता तेथे ओळखीचे प्रशांत कदम व त्याच्या सोबत सात ते आठ जण हातात तलवार, चाकू, रॉड घेऊन आले होते.
यावेळी प्रशांत कदम याने दुकानदार ओमकार माने यांना शिवीगाळ करीत तू फटाके उधार का देत नाही या कारणावरून हातातील तलवारीने ओमकारवर जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केला. त्याने वार चुकविल्याने तलवार पेंडालच्या दुकानाच्या लोखंडी पाईपला लागली. त्यानंतर तेथे असलेला त्याचा भाऊ सारंग ज्ञानेश्वर माने हा भांडणे सोडव्यासाठी आला आसता त्यास प्रशांत कदम याने त्याचे हातातील तलवारीने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.
यावेळी विशाल शिंदे याने तलवारीने फिर्यादीच्या डोक्यावर तर आदेश पवार याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने माझ्या डावे हातावर मारून हात फॅक्चर करून गंभीर जखमी केले. सारंग माने यास प्रशांत कदम सोबत असलेले आदेश पवार, विकास मोरे, आकाश सुपेकर, संस्कार भालेराव व इतर तीन ते चार इसमांनी खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी रामेश्वर उबाळे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात प्रशांत कदम, रा. आनंदवाडी, विशाल शिंदे, आदेश पवार, रा. वरफळवाडी, विकास मोरे, रा. परतूर, आकाश सुपेकर, रा. आनंदवाडी, संस्कार भालेराव रा परतूर यांच्यासह तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड हे करीत आहेत.