

आन्वा ः वीस रुपये विकणारी मेथीच्या जुडीला सरासरी दोन ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून काढणी मजुरी, वाहतूक खर्च याचा विचार करता सध्याच्या बाजारभावात भांडवली खर्च वसूल होणार नाही. यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मेथीच्या भावात चढ-उतार सुरू असून, सध्या आवक जास्त असल्याने आणि मागणी कमी असल्याने भाव कवडीमोल झाले आहेत. मेथीच्या एकरी तीन ते चार हजार जुड्या निघतात. काढणी मजुरी व वाहतूक खर्चासाठी शेकडा अडीचशे ते तीनशे रुपये, बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीची मशागत आदींसाठी एकरी सुमारे चाळीस हजार रुपये खर्च येतो. पेरणी ते विक्रीपर्यंत एका जुडीच्या उत्पादनासाठी पाच ते सहा रुपयांचा खर्च होतो. मात्र यंदा मेथीचे दर पडले असून शेतकऱ्यांना मातीमोल भाव विकावे लागत आहेत.
दरम्यान अधिक उत्पादनासाठी शेतकरी आता संकरित बियाण्यांचा वापर करत आहेत. संकरित बियाण्यांपासून उत्पादित झालेली मेथी दिसायला तजेलदार व हिरवीगार असून टिकाऊ क्षमताही जास्त असते. मात्र संकरित मेथीला गावठी कोथिंबिरीसारखा वास व चव नसते. यामुळे घरगुती ग्राहकांकडून गावठी मेथीला मागणी असते. मात्र उत्पादन कमी असल्याने शेतकरी आता संकरित बियाण्याकडे वळला आहे. यामुळे गावठी बियाणे आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
निराशा
पारंपारिक पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला घेण्याकडे वळाला आहे. परंतू यात भाजीपाल्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकंदरीत मेंथीच्या भाजीचे भाव पडले आहे.