

CM OSD visit Manoj Jarange in Antarwali Sarati
वडीगोद्री; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे २७ ऑगस्टरोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटी मध्ये येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजेंद्र साबळे मंगळवारी सकाळी मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यामुळे जरांगे यांच्या उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी त्यांच्यासोबत थेट वाटाघाटी सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे.
त्यानुसार ते उद्या सकाळी १० वा. आपल्या लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होतील. ते मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. या आंदोलनामुळे मुंबईत लाखो लोकांची गर्दी होणार आहे. त्यातच उद्यापासून गणेशोत्सव सुरू होणार असल्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा बाका प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी एक पाऊल पुढे टाकत जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या प्रयत्नांर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. यावेळी जरांगे व साबळे यांच्यात माध्यमासमोरच चर्चा झाली. पत्रकारांशी संवाद साधताना साबळे यांनी आपण केवळ जरांगे यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घेण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांची यासंदर्भात काही अडचण आहे का? हे जाणून घेण्याचाही माझा उद्देश आहे. माझी यापूर्वी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती. सध्या गणेशोत्सव आहे. त्यामुळे आंदोलन पुढे ढकलू शकता का? अशी विनंती मी त्यांना करणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी जरांगे पाटील यांनी आम्हाला आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक मार्ग द्या. अनेक रस्ते आहेत. त्यातील एक रस्ता आम्हाला द्या, त्यामुळे मुंबईतील गणेश भक्तांना कोणताही त्रास होणार नाही, त्यासाठी आम्ही आंदोलकांसाठी एक मार्ग मागतोय, असे जरांगे पाटील म्हणाले.