

Anganwadi workers march on Mini Mantralaya
जालना, पुढारी वृत्तसेवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि. ८) रोजी जालना जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला.
आयटकप्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास जिगे, कृष्णा वाहुळे, गजानन तळेकर, दुर्गा टकले आदीच्या नेतृत्वाखाली अंबड चौफुलीवरून घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला.
शिष्टमंडळाने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गोरे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करावी, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वर्ग-३ व ४ चा कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी, महागाई भत्ता व अन्य सर्व भत्ते ग्रॅज्युईटी, भविष्यनिर्वाह निधी, मासिक पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करावा, अंगणवाडी केंद्रातील एफआरएसची कामे मोबाईल अभावी होत नसल्याने बंद करावे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कुटुंबातील फेर सर्वेक्षणाचे काम इतर योजनेकडून करून घेण्यात यावेत, अंगणवाडीमध्ये येत असलेला टीए चआर आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने ताजा सकस आहार शासनाने पुरवावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी जिगे म्हणाले की, राज्यभरामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना शिकविण्याऐवजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा देण्यात येत आहे. यामुळे मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिल्या जात नसल्याने गावपातळीवर कर्मचाऱ्यांचा व पालकांचा रोष वाढत चालला आहे. या मोर्चात उषा मगरे, सविता देशमुख, नंदा शिंदे, संगीता इंगळे, सागर वाढेकर, सुरेखा भानापुरे, अरुणा इरशे, अनिता रानमाळ, अनिता पिंपळे, जुगनाबी चाऊस, शोभा तौर, ताई नरवडे, गीता बावसकर, अल्का पुरी, अश्विनी कुलकर्णी, मंगला पगारे, अर्चना जाधव, छायाबाई थोटे, वनमाला पवार, निर्मला देशमुख, पद्यछाया बनगुजरे, अनिता पगारे यांच्यासह जालना जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.