Anandacha Shidha : रेशनमधून 'आनंदाचा शिधा' गायब

योजना बंद झाल्याने दुष्काळात गरीब वाऱ्यावर; गरजू कुटुंबांची निराशा, शासनाचे दुर्लक्ष
Anandacha Shidha
Anandacha Shidha : रेशनमधून 'आनंदाचा शिधा' गायबfile photo
Published on: 
Updated on: 

'Anandacha Shidha' missing from ration supplies

आन्वा, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि गोडधोडाचा सण मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गरीब कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी निराशेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीच्या काळात राशन दुकानांतून मिळणारा 'आनंदाचा शिधा' उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Anandacha Shidha
Fraud Case : फेसबुकवरचं प्रेम पडलं महागात; लग्नाचे आमिष दाखवून भामट्याने उकळले ९.३६ लाख

आनंदाचा शिधा' योजना बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गरीब कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सण गोड करण्याच्या अपेक्षेने वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे चित्र दिसत आहे.

महागाईमुळे आधीच घरखर्च भागवताना सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, रोजंदारीवरील अनिश्चित उत्पन्न आणि सणासुदीच्या अतिरिक्त खर्चामुळे गरीब कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 'आनंदाच्या शिध्या'ची अपेक्षा होती. मात्र राशन दुकानांत हा शिधा उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड होत आहे.

दिवाळीच्या निमित्ताने घरात गोडधोड बनवावे, मुलांना आनंद द्यावा आणि कुटुंबासोबत सण साजरा करावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, हातावर पोट असलेल्या कुटुंबांसाठी सणाचा खर्चही मोठे आव्हान ठरत आहे. शासनाच्या मदतीमुळे सणाचा भार काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा असताना 'आनंदाचा शिधा'च मिळत नसल्याने गरीब कुटुंबांमध्ये नाराजी आहे.

Anandacha Shidha
Jalna News : ५० शेतकऱ्यांना करडई बियाण्याचे वाटप

दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असताना सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या मदतीबाबतही अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. दिवाळीसारख्या सणात गरजू कुटुंबांना दिलासा देणाऱ्या योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. दुष्काळाने उत्पन्न घटले, महागाईने खर्च वाढवला आणि आनंदाचा शिधाही मिळेनासा झाला, तर गरीबांनी दिवाळी साजरी करायची तरी कशी? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आनंदाचा सण प्रत्येकाच्या घरात उजळावा, यासाठी शासनाने गरीब आणि गरजू कुटुंबांच्या परिस्थितीची दखल घेऊन ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, अनेक कुटुंबांची दिवाळी दिव्यांच्या प्रकाशातही आर्थिक विवंचनेच्या अंधारातच जाण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.