Chhatrapati Sambhajinagar Illegal Mining : गांधेलीत गौण खनिज माफिया बेफाम

जिल्हा प्रशासनालाही जुमानेना, डोंगर पोखरून खडी, मुरुमाची तस्करी
Chhatrapati Sambhajinagar Illegal Mining
गांधेलीमध्ये डोंगर पोखरून अशा प्रकारे मुरूम व खडीची सर्रासपणे चोरी केली जात आहे. (छाया : सचिन लहाने)
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात मुरूम, खडीसाठी मोठ्याप्रमाणात डोंगर पोखरण्याचा सपाटा गौण खनिज माफियांनी सुरू केला आहे. काहींनी एका ठिकाणच्या परवानगीवर दुसऱ्या ठिकाणी पोकलेनद्वारे पोखरणे सुरू केले आहे. तर काहींनी परवानगी विनाच डोंगरांना जेसीबी, पोकलेन लावले आहेत. गांधेली परिसरात बाग तलाव येथील गट नंबर ६ व २६३ येथे अवैधरीत्या उत्खनन सुरू असून महसूल बुडवून दिवसाला सुमारे ५० ते ६० हायवा भरून मुरूम व दगडांची विक्रीसाठी वाहतूक केली जात आहे.

शहरालगतच्या काही ग्रामपंचायर्तीच्या हद्दीत सध्या डोंगर पोखरण्याचे काम जोरात सुरू आहे. यात खासगी जागेत उत्खननाची परवानगी घेऊन माफिया सर्रासपणे सरकारी गायरान, डोंगरावर पोकलेन लावून रात्रंदिवस उत्खननाचे काम सुरू केले आहे. यात चौका, गांधेली आणि वाळूज परिसरातील डोंगरांचा समावेश आहे. गांधेलीमध्ये तर बाग तलावातील गाळ काढण्याचे काम घेऊन काहींनी थेट तलावापासून जवळ असलेल्या डौगरावरच उत्खननाचे काम सुरू केले आहे. यातून दररोज गौण खनिजची मोठ्याप्रमाणात चोरी करून माफिया विक्री करीत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Illegal Mining
Abdul Sattar : दुष्काळात कर्जवसुलीला स्थगिती द्या !

या अवैध उत्खननामुळे डोंगराचे सपाटीकरण करण्याचे काम गांधेली परिसरात सर्रासपणे सुरू आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाने सपशेल दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे माफियादेखील बेफाम झाले असून दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाचे दोन अधिकारी एका तक्रारीवरून या परिसरात पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर गौण खनिज माफियांनी हल्ला केला. त्यात महसूलचे कर्मचारी जखमी झाले असून गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मागील दीड वर्षापासून या परिसरात माफियांकडून डोंगर पोखरून त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू होते. याविरोधात प्रशासनाकडे अनेक तक्रारी देखील गेल्या. परंतु, त्याकडे सपशेल दुर्लक्षच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विनापरवानगी उत्खनन

गांधेलीचे डोंगर विनापरवानगी पोखरले जात होते. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने परिसरात धाड मारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे यापूर्वी अनेक तक्रारीनंतरही प्रशासनाने या परिसरात धाड मारण्याचे धाडस केले नव्हते, अशी चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar Illegal Mining
Sambhajinagar Water Theft : दुष्काळातही कायगाव तलावातील पाणी चोरीला

कोट्यवधींच्या महसुलावर पाणी

दररोज सुमारे ५० ते ६० हायवा भरून मुरूम, खडी चोरी केली जात आहे. वर्षभरापासून हा प्रकार गांधलीत सर्रासपणे अवैधरीत्या सुरू होता. रॉयल्टीचाच विचार केला तर दिवसाला ६० हायवाची रॉयल्टी २ लाख रुपये होते. त्यानुसार महिन्याला ६० ते ७० लाखांची आणि वर्षभरात सुमारे ६ कोटी रुपयांची रॉयल्टी या माफियांनी बुडविली आहे.

मुरुमच्या १ हायवावर रॉयल्टी

गांधेली येथील डोंगर पोखरून दररोज रात्रंदिवस ६० हायवा भरून मुरूम, दगडाची तस्कारी केली जात आहे. मुरुमवर सुमारे ६०० रुपये ब्रास रॉयल्टी वसूल केली जाते. एका हायवामध्ये सुमारे ५ ते ६ ब्रास मुरूम भरण्यात येतो. एका हायवामागे ३००० ते ३६०० रुपयांची रॉयल्टी बुडविण्यात येत होती.

गांधलीत डोंगर अवैधरीत्या पोखरण्याचे काम सुरू होते. मंडळ अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली असता त्यांच्यावरच माफियांनी हल्ला केला. याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. आता संबंधित माफियांनी जेवढे डोंगर पोखरले व गौण खनिजाची चोरी करून विक्री केली. त्याबाबत मोजणी करून संबंधित माफियांकडून दंडासह शुल्क वसूल केले जाईल.

ऋषीकेश डांगे, जिल्हा गौण खनिज अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.