अंबड : ‘दुष्काळ असेल तर सरपंचाला किंवा सरकारला सांग; मला सांगू नको. आजच्या आज हप्ता भर; कर्ज भरायचे नसेल तर कुठेतरी जाऊन मरत का नाहीस; जीव का देत नाहीस?’ अशा अत्यंत संतापजनक शब्दांत मायक्रो फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटने कर्जदार शेतकऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप रविवारी वृत्तवाहिन्यांवरून व्हायरल झाल्याने अंबड तालुक्यात खळबळ उडाली आहे. दुष्काळ आणि पत्नीच्या आजारपणामुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या हताश शेतकऱ्याला वसुली एजंटने थेट आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे शब्द वापरल्याचा हा प्रकार समोर आला आहे.
अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील राम गोरखनाथ पारवे यांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्याने; तसेच पत्नीच्या आजारपणामुळे तीव्र आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांना कर्जाचे हप्ते वेळेत भरणे शक्य झाले नाही. यावरून कंपनीच्या महिला आणि पुरुष प्रतिनिधींनी त्यांच्याकडे ३८ हजार ६५८ रुपये भरण्यासाठी सातत्याने तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पीडित शेतकरी राम पारवे हे दुष्काळामुळे रोजगार नसल्याचे आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगत हप्ता भरण्यास असमर्थता व्यक्त करताना ऐकू येतात. मात्र, त्यावर वसुली एजंटने ‘कर्ज घेतले कशाला?’ आणि ‘कर्ज भरायचे नसेल तर मरत का नाहीस?’ अशा अतिशय अपमानास्पद व क्रूर शब्दांत त्यांना धमकावल्याचे या संवादातून स्पष्टपणे समोर आले आहे.
या संतापजनक प्रकाराबाबत राम पारवे यांनी अंबड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावर त्यावेळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीने या शेतकऱ्याकडे कर्जवसुलीचा तगादा तात्पुरता बंद केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हे प्रकरण काही दिवस शांत झाले होते. मात्र, रविवारी ही ऑडिओ क्लिप वृत्तवाहिन्यांवरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने दिवसभर संपूर्ण मराठवाड्यात या धक्कादायक प्रकाराची तीव्र चर्चा सुरू झाली.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जुलमी वसुली पद्धती पुन्हा चव्हाट्यावर
दुष्काळाच्या भीषण झळा सोसणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नावाखाली मानसिक त्रास देण्याच्या प्रकारावर संपूर्ण तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुष्काळात शेतकरी आर्थिक संकटात असताना कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारी भाषा वापरणे हा कायदेशीर गुन्हा असून, अशा मुजोर वसुली एजंटांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.