

वडीगोद्री ः अंबड तालुक्यातील नालेवाडी शिवारात शनिवार, दि. 18 रोजी दुपारी एका विवाहित महिलेचा मृतदेह डाव्या कालव्याजवळ आढळला. ही आत्महत्या नसून कट रचून खून करण्यात आला असल्याची बाब विवाहित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यावरून समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री गोंदी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी बाबासाहेब छगन राठोड़ रा. जोगेश्वरवाडी, जामखेड, ता. अंबड यांच्या विरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत विवाहित महिलेचे नाव सुरेखा नंदकिशोर आन्वीकर असे आहे. ती नवऱ्यासोबत भांडण करून प्रियकरासोबत गाडीवर बसून या भागात आली. मी आता तुझ्या सोबतच राहणार असे ती प्रियकराला म्हणाली. मात्र विवाहित प्रियकराने ती आपल्या गळ्यात पडेल म्हणून तिचा काटा काढण्याचे ठरवले. अखेर त्याने तिला दुचाकीवर फिरवलं अन् शेवटी तिला डाव्या कालव्यात ढकलून तिचा खून केला.
या प्रकरणी नंदकिशोर जगन्नाथ आन्वीकर यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब राठोड याच्या विरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी यास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात यांच्याकडे आहे
विवाहितेच्या प्रियकरानेच उचलले टोकाचे पाऊल
या प्रकरणी दरम्यान, नंदकिशोर जगन्नाथ आन्वीकर रा. मातोश्री नगर गल्ली नं. 5 ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत पत्नी सुरेखा हिला कन्या शाळा गारखेडा परिसर छ. संभाजीनगर येथून बाबासाहेब छगन राठोड़ रा. जोगेश्वरवाडी, जामखेड, ता. अंबड याने मोटारसायकलवर बसवून आणले. नालेवाडी शिवारात जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या जवळ नेऊन तिला कालव्याच्या वाहत्या पाण्यात ढकलून देऊन तिचा खून केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.