

Ambad Chowphuli Signal in the City Paralyzed; Traffic Disrupted Due to Power Outage
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अंबड चौफुली येथील महत्त्वाच्या सिग्नल यंत्रणेचा सोमवार (दि. २३) रोजी सकाळी अचानक बत्तीगुल झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा उडाला. सकाळी ११.१५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे सिग्नल पूर्णपणे बंद पडले होते. परिणामी चौफुलीवर काही काळ वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण झाला.
अंबड चौफुली हा शहरातील वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. सिग्नल बंद पडताच वाहनचालकांनी आपापल्या सोयीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने चौकात अडथळे निर्माण झाले. दुचाकी, रिक्षा, तसेच जड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली.
या दरम्यान काही वेळ वाहतूक पोलिसांचा अभाव जाणवल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, सिग्नल यंत्रणा वीजेवर अवलंबून असल्याने बत्तीगुल होताच ती पूर्णपणे ठप्प होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रमुख चौकांमध्ये पर्यायी व्यवस्था किंवा बॅकअप यंत्रणा उभारण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा अशे वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे.
पादचाऱ्यांची गैरसोय वाढली
अंबड चौफुली येथे झेब्रा क्रॉसिंगची रेषा पूर्णपणे मिटल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. सिग्नल बंद असताना तर परिस्थिती अधिकच बिकट होते. वाहनांची सततची वर्दळ आणि स्पष्ट मार्गदर्शक रेषांचा अभाव यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने झेब्रा क्रॉसिंग पुन्हा रंगवून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.