

जाफराबाद (जालना) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या नवऱ्याने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवार दि. २४ रोजी सायंकाळी सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
मयत संगीता काशिनाथ जारे (४५) या शेतात कुटुंबासह काम करत होत्या. यावेळी दारू पिण्यासाठी काशिनाथ जारे यांनी त्यांना पैसे मागितले. मात्र, पत्नी संगीता जारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित नवरा काशिनाथ संतोष जारे (५०) याने संतापाच्या भरात पत्नीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पत्नी संगीता जारे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा पवन काशिनाथ जारे (२५) यांनी पोलिसात फिर्याद दिली. मामा विष्णू त्रिंबक गोरे यांनी देखील तक्रार नोंदवण्यासाठी उपस्थिती लावली. जाफराबाद पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.