

Inspection and damage assessment (panchnama) has commenced in the Tembhurni-Kumbharzhari and Kotha Koli areas
टेंभूर्णी, पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी व कुंभारझरी महसूल कृषी मंडळ आणि भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी शिवारात बांधावर जाऊन पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. यंदा दुष्काळाने दाहक रूप धारण केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस व मका पिके पूर्णतः करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने अखेर गुरुवार, दि. १ पासून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत.
कुंभारझरी व टेंभुर्णी मंडळात महसूल पथक शेतात दाखल होताच अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. महिला शेतकऱ्यांनी करपलेले सोयाबीन हातात घेऊन हंबरडा फोडला, चार महिने राबलो, खत-पाणी टाकले, आता सगळं वाया गेलं," असे म्हणत एका महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. या पथकात जी.एन. तागडे, राजाराम गायके, रेखा चिंचोले (ग्रामसेवक), ज्योती शिंदे (कृषी सहाय्यक), मदन डोईफोडे (ग्रामसेवक), निवृत्ती भगत (कृषी सहाय्यक) यांचा समावेश होता.
तर कोठा कोळी शिवारात पंचनामा करताना कृषी सहायक विनायक दळवी, तलाठी शीतल लव्हाळे आणि ग्रामसेवक दौड यांनी आपली भूमिका बजावली. पंचनामे पूर्ण झाल्यावर अहवाल ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर होणार असून, त्यानंतर शासनाकडून मदत जाहीर होण्याची शक्यता आहे महसूल विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडला खर्चाचा हिशोब
नांदखेडा येथील प्रगतशील शेतकरी कारभारी सवडे यांनी मंडळाधिकाऱ्यांसमोरच आपल्या खर्चाचा हिशेब मांडला. त्यांनी नांगरणी, रोटा, फुली काढणे, बियाणे, लागवड, पहिला खत डोस, फवारणी, पेट्रोल, मजुरी, दुसरा खत डोस, डवरणे, निंदणे आर्दी कापसासाठी एकरी कमीत कमी ३५,२०० रुपये खर्च येतो. इतका खर्च करूनही हातात पीकच नाही, तर शेतकऱ्याने जगायचे कसे? शासनाने तातडीने एकरी ३५ हजार रुपये मदत, पीक कर्ज माफी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टैंकर सुरू करावेत," अशी मागणी सवहे यांनी मंडळाधिकाऱ्यांचे पाय धरून केली.