

Abundant water storage in Dhamana Dam
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा
भोकरदन तालुक्यातील सेलुद येथील धामणा धरणातुन बारा गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. यंदा धरणात जून महिन्यात २२ टक्के जलसाठा असल्याने बारा गावावरील पाणी संकट टळले आहे.
सेलूद येथील धामणा धरण परिसरात गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हर फ्लो झाले होते. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात धरणात तब्बल २२ टक्के एवढा जलसाठा असल्याने परिसरातील वडोद तांगडा, जळकी बाजार, आन्वा, जळगाव सपकाळ, वालसांगवी, हिसोडा खुर्द, हिसोडा बुद्रुक, सेलुद, पोखरी, धावडा, खुपटा, लेहा या गावारील पाणी संकट यंदा टळले आहे.
दोन वर्षापूर्वी धामणा धरण कोरडे पडल्याने या बारा गावांमधे भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या बारा गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक राहात असल्याने बारा गावांतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही.
धामणा धरणातील पाणी पातळीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घट होऊ लागल्याने धरण परिसरातून होणारा अवैध पाणी उपसा थांबविणे गरजेचे आहे. सध्या मान्सून मराठवाड्यात येत असल्याने भविष्यात नागरीकांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही. धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने धरण परिसरात मे महिन्यात लागवड केलेले मिरचीचे पिक चांगलेच बहरले आहे.