

Students will get books on the first day: Group Education Officer Chavan
मंठा, पुढारी वृत्तसेवा:
येत्या शैक्षणिक सत्राच्या अर्थात शाळेच्या पहिल्याच दिवशी दि. १६ जून रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या हातात नवीन कोरी पाठ्यपुस्तके आणि गणवेश मिळणार आहे. सध्या पाठ्यपुस्तकांचे वितरण तालुका, केंद्र आणि शाळास्तर या क्रमाने युध्दस्तरावर केले जात आहे. अशी माहिती नूतन गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण यांनी दिली.
यावर्षीही समग्र शिक्षा अभियान (एस.एस.ए.) अंतर्गत इयता पहिली ते आठवीच्या मराठी, उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शासकीय शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार असल्याने पालकांनी खुल्या बाजारातून पाठ्यपुस्तकांची खरेदी करू नये असे आवाहन देखील त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत तालुका कार्यालयास जिल्हा कार्यालयाकडून ९४ हजार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून उर्वरित दहा टक्के पाठ्यपुस्तके लवकरच जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त होणार असल्याचे संकेत आहेत. तालुका कार्यालयाकडून केंद्रस्तरावर व केंद्रस्तरावरून शाळास् तरावर पाठ्यपुस्तकांचे युद्धपातळीवर वितरण सुरु करण्यात आले आहे. एकही विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजना तसेच मोफत गणवेश योजनेच्या लाभापासून वंचित राहणार याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आल्या असून योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व जात प्रवर्गाच्या मुलां मुलींना सदरहू दोन्ही योजनांचा लाभमिळणार असून मोफत शालेय गणवेश हे खरेदी करण्याचे सर्वाधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले असून शालेय व्यवस्थापन समित्यांना निधीचे वितरण तालुका स्तरावरून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शालेय व्यवस्थापन समित्या आणि शाळा प्रमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी गणवेश व बूट सॉक्स खरेदी करताना शासन निर्णयानुसार गुणवत्ता व दर यांची पडताळणी करूनच तसेच महाराष्ट्र ट्रेझरी रूल व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई (एमपीएसपी) यांनी घालून दिलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आर्थिक अनियामियतता आढळून आल्यास संबंधित शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या विरोधात योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल अश्या संबंधितांना देण्यात आला आहे.
मोफत गणवेश योजनेसाठी प्रतिविद्यार्थी मुलां मुलींसाठी तीनशे रुपये प्रती गणवेश या प्रमाणे दिल्या जातो. तालुक्यातील १० हजार ९५ विद्यार्थ्यांसाठी सुमारे ३० लक्ष २८ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांना बूट सॉक्स खरेदीसाठी प्रती विद्यार्थी रुपये १७० रु. प्रमाणे १० हजार ६७० विद्यार्थ्यांसाठी १८ लक्ष १३ हजार ९०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.