

'Aarogya Samvad Yatra' (Health Dialogue Tour) in Jalna district; Health Minister Abitkar to engage in dialogue
जालना, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आज, २७ नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यात आरोग्य संवाद यात्रेनिमित्त येत असून यादरम्यान विविध रुग्णालयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाद्वारे कोट्यवधींच्या आरोग्य सुविधांचे भव्य लोकार्पण करणार आहेत. यात प्रामुख्याने जिल्हा स्त्री रुग्णालयातील माता व बाल आरोग्य विभाग (एमसीएच विंग) तसेच अंबड आणि घनसावंगी येथील १०० खाटांच्या नवनिर्मित उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.
याच दौऱ्यात कुंभेफळ येथील ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून मंत्री आबिटकर आढावा घेतील. या प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. भोकरदन ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांच्या रुग्णालयाची इमारत उभारण्याचे कामही सुरू आहे. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळतील.
आरोग्य संवाद यात्रेदरम्यान मंत्री आबिटकर जिल्हा परिषद येथे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधतील. यातून जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि विविध राष्ट्रीय योजनांच्या अंमलबजावणीकामी नेर, बदनापूर, परतूर, राजूर, टेंभुर्णी आणि जाफराबाद येथील रुग्णालयांच्या बळकटीकरणाचा आढावा घेतला जाईल.
जिल्हा रुग्णालयात अद्ययावत कॅथलॅब
जालना जिल्हा रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी 'कॅथलॅब' सुरू करण्यात येत आहे. या अद्ययावत सुविधेचे भूमिपूजन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून यामुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी इतर शहरांत धाव घेण्याची गरज पडणार नाही.