

जालना ः नागरिकांना मिळणाऱ्या सेवा या आपले सरकार या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्या विहित कालमर्यादेतच निकाली काढणे बंधनकारक आहे, असे अवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी केले.
जालना शहर महानगरपालिकेला किरण जाधव यांनी मंगळवार (10) रोजी भेट देऊन सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेतील सेवा ऑनलाईन करण्यावर आणि पारदर्शकतेवर विशेष भर दिला.आयुक्त किरण जाधव यांचा सत्कार व मार्गदर्शन महानगरपालिकेत आगमन झाल्यानंतर उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते आयुक्त किरण जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत जाधव यांनी जर एखादा अर्ज फेटाळला जात असेल, तर त्याचे ठोस कारण अर्जावर नमूद करून तसे पत्र संबंधित नागरिकाला द्यावे, जेणेकरून त्याला अपील दाखल करता येईल असे सांगीतले. भोपाळच्या धर्तीवर प्लॅन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ताधारकांना तात्काळ सेवा देण्याच्या दृष्टीने जालना महापालिकेने पावले उचलावीत.
सेवा हक्क कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व सेवा लवकरात लवकर 100% ऑनलाईन करण्यात याव्यात .पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सेवांच्या आधारावर त्यांना गुण दिले जातील. तसेच, दर महिन्याचा अर्जांचा मासिक घोषवारा राज्य लोकसेवा आयोगाकडे सादर करणे अनिवार्य आहे.
ज्या विभागात नागरिकांना उत्कृष्ट व जलद सेवा दिली जाईल, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण बैठकीस महापौर वंदना अरुण मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, पदनिर्देशित अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
ऑनलाईन सेवा
जालना शहर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगांतर्गत असलेल्या सर्व सेवा या महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल तसेच आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.