

Aadhaar authentication pending for 78,215 farmers
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात सुमारे १ लाख ७ हजार ५०५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, अद्यापि ७८ हजार २१५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे उघड झाले आहे. या लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक, जालना यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या आणि दि. ३१ मार्च २०२६ अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाची मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मात्र, या पात्र लाभार्थ्यांपैकी २९ जुलैपर्यंत केवळ २९ हजार २९० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, अजूनही ७८ हजार २१५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रावर विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्याची माहिती आणि थकीत कर्जाची रक्कम दिसून येईल. सदर रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शवून आधार प्रमाणीकरण करावे. जर रकमेबाबत शंका अथवा आक्षेप असल्यास असहमती नोंदवूनही आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी असहमती नोंदवल्यानंतर संबंधित तक्रार ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या अभिलेखांच्या आधारे तक्रारीची शहानिशा करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल आणि सुधारित माहिती पुन्हा पोर्टलवर अपलोड केली जाईल.
२ लाख ३ हजार जणांची माहिती अपलोड
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यातील सर्व बँकांनी एकूण २ लाख ३ हजार २८३ थकबाकीदार खातेदारांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. या माहितीच्या आधारे २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी यादीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ५०५ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.