

A person's throat was cut by a pantag manja, incident in Bhokardan city, action against the sellers
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः येथील सिल्लोड रस्त्यावरील महात्मा फुले चौकात दुचाकी वरून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या गळा पंतगाच्या मांजामुळे कापल्या गेल्याची घटना घडली. या अपघातात व्यापाऱ्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
सिल्लोड येथील व्यापारी सांबेरखा लालखा पठाण हे ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान दुचाकीवर भोकरदन येत असताना महात्मा फुले चौकातील महाराष्ट्र बँके समोर अचानक कटलेला पतंग रस्त्यावर आला.
यावेळी सांबेरखा हे दुचाकीवर तेथुन जात असतांना कटलेला पंतग त्यांच्या गळ्यात अडकला. त्यामुळे पठाण यांचा गळा चिरला गेल्याने ते दुचाकीवरून खाली कोसळले. याच दरम्यान त्यांच्या पाठीमागे दुचाकीवर येत असलेले माजी नगरसेवक दिपक बोर्डे, प्रदिप जोगदडे यांनी गाडी थांबवून त्यांना गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या ठिकाणी डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यास सांगीतले. घटना घडली त्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त पडल्याचे पहावयास मिळाले.
भोकरदन पोलिस ठाण्याचे कर्मचारी गणेश पिंपळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शहरातील दोन ते तीन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. शहरात मोठ्या प्रमाणात पतंगाचा प्रतिबंधीत मांजा विक्री होत आहे.