

A fight between two groups over a dispute between young children
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांत हाणामारीची घटना शुक्रवारी रात्री घडल्याची माहिती बदनापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे शुक्रवारी रात्री दोन गटात वाद झाला होता. तत्पूर्वी दोन गटांतील वाद बदनापूरचे तहसीलदार हेमंत तायडे, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी मांजरगाव येथील गावकऱ्यांची बैठक घेऊन हा वाद मिटविला होता. त्यानंतर पुन्हा ८ ऑगस्ट रोजी दोन शाळकरी मुलांच्या किरकोळ भांडणाच्या वादातून दोन गट आमने सामने येऊन वाद झाला. यावेळी दोन्ही गटांतील लोक हातात काठ्या व दगडे घेऊन एकमेकांच्या घरात घुसून मारहाण करीत असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच बदनापूरचे पोलिस निरीक्षक मच्छिद्र सुरवसे यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी भांडण करणाऱ्यांमधील काही लोक पळून गेले. घटनास्थळावरून दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या वादात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणास काही जण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक कैलास सुखदेव लांडगे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांतील तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ए.ए. राठोड हे करीत आहेत.
जातीय रंग देउ नका
सदरचा वाद हा दोन लहान मुलांच्या भांडणावरून झालेला आसुन त्या वादाला कोणीही धार्मीक अथवा जातीय रंग देउ नये. चुकीची बातमी व आफवा कोणीही पसरवू पये अन्यथा पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.