

जालना : वयाची ६७ वर्षे उलटूनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात, हे जालना येथील प्राचार्य जवाहर काबरा यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित लेह-उमलिंगला पास सायकल एक्सपीडिशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी तब्बल १९,०२४ फूट उंचीवर सायकल चालवण्याचा पराक्रम केला आहे.
२० ते ३० जुलै दरम्यान आयोजित या मोहिमेत प्रा. काबरा यांनी ३६५ किलोमीटरचा दुर्गम प्रवास सायकलद्वारे पूर्ण केला. लेहपासून (११,५०० फूट) सुरू झालेला हा प्रवास शारा, चूमाथांग, न्योमा, हांले आणि चूसुमले अशा विविध टप्प्यांतून उमलिंगला पासपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे मोहिमेच्या अंतिम टप्प्यात १३,९०० फुटांवरून थेट १९,०२४ फुटांपर्यंतची ५ हजार फुटांची खडतर चढाई पूर्ण करताना त्यांच्या शारीरिक क्षमतेसह मानसिक दृढतेचीही मोठी परीक्षा झाली.
एवढेच नव्हे तर हॅन्ले ते चुसुमले दरम्यानचा २५ किमीचा कच्चा रस्ताही अत्यंत आव्हानात्मक होता. मात्र, जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे सर्व अडथळे पार केले. मोहिमेच्या शेवटी लेह येथे आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सर्व सायकलपटूंचा गौरव करण्यात आला.
केवळ सायकलिंगच नाही, तर लडाखच्या निसर्गाचा आणि तेथील जनजीवनाचा जवळून परिचय झाला. लडाखी कुटुंबांसोबत राहिल्यामुळे तिथली संस्कृती, खानपान आणि आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळाली. स्वतःवरील विश्वासासह नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. संकटाला सामोरे जाण्याची यामुळे प्रेरणा मिळले.
जवाहर काबरा, सायकलपटू