जालना: माहोरा सह परिसरात पावसाची हजेरी बळीराजा सुखावला… | पुढारी

जालना: माहोरा सह परिसरात पावसाची हजेरी बळीराजा सुखावला...

माहोरा प्रतिनिधी; पुढारी वृत्तसेवा: जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा सह परिसरात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २०-२५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी सकाळी माहोरा परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी मात्र शेतकर्‍यांना शेतामधुन होणार्‍या उत्पन्नामध्ये काही जास्त परिणाम होणार नसला तरी, जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

राज्यभरात साधारण महिनाभरापासून पाऊस गायब झाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. यात हवामान विभागाकडून ६ तारखेपासून पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी माहोरासह परिसरात पावसाने हजेरी लावला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे मक्का,सोयाबिन,तसेच कपाशी या पिकांना नक्कीच फायदा होणार आहे. पावसाळा संपत आला असताना देखील मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांचे पिके हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र जोरदार पाऊस आल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली असली, तरी उत्पन्नात घट मात्र होणार हे नक्की आहे.

Back to top button