

40 encroachments removed in the jalna city
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर महानगरपालिकेमार्फत बुधवारी (दि. २१) सावरकर चौक ते बसस्टँड रोड परिसरात धडक अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून तब्बल ४० अतिक्रमणे हटविण्यात आली. आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार तसेच सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान दुकानांसमोरील अनधिकृत ओटे, पायऱ्या आणि शेड हटविण्यात आले. तसेच नाल्यांवरील अतिक्रमणे तोडून नाले पूर्णपणे मोकळे करण्यात आले. कारवाई संपताच रस्त्यावर साचलेला मलबा, कचरा आणि ढिगारा मनपा प्रशासनाने तात्काळ उचलून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, शहरातील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नाले तुंबल्या जात होते. परिणामी, मागच्या पावसाळ्यात शहरातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. कुंडलिका आणी सीना नदीलाही मोठा पूर आला होता. त्यामुळे यंदा शहर महानगर पालिका प्रशासनाने मान्सुनपूर्व नाले सफाईचे कम हाती घेतले आहे. त्याच बरोबर अतिक्रमण देखील काढण्यात येत आहे. या दोन्ही मोहिमा सोबत सुरू असल्यामुळे शहरातील नाल्यावर असलेले ओटे, अनधिकृत बांधकाम हटविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी स्वतः अतिक मण पथकासोबत जाऊन नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. मोहीमेसाठी एक जेसीबी, एक टिप्पर तसेच पोलिस पथकाचे सहकार्य घेण्यात आले. अतिक्रमण प्रमुख बी. सी. राठोड यांच्या नेतृत्व-खाली शामसन कसबे, अजय पेम्बर्ती, अमजद खान, शेख कादर, आमेर खान तसेच स्वच्छता विभागातील १० ते १२ सफाई कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. येत्या काळात अजून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला अहे.