

जालना : जालना शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 11 मे पासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा धडाका कायम असून सहा दिवसांत तब्बल 148 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवार (दि.15) रोजी नूतन वसाहत, अंबड चौफुली आणि घाटी रोड परिसरातील अतिक्रमणे निष्काशित करण्यात आली.
दरम्यान, उड्डाणपूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (नूतन वसाहत), अंबड चौफुली आणि घाटी रोड परिसरात रस्त्यांवरील अवैध बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला. या कारवाईदरम्यान गुरूवारी चिकन-मटण विक्रीची 17 अवैध दुकाने व शेड हटविण्यात आली. तर शुक्रवारी देखील 13 अवैध चिकन मटनची दुकाने हटविण्यात आली.
दोन दुकानांना सील ठोकण्यात आले. रस्त्यांवरील वाढीव बांधकामे, दुकानांचे ओटे, सिमेंटचे ढापे, पायऱ्या, पत्र्याचे शेड तसेच नाल्यांवरील अनधिकृत फरशा हटवून रस्ते आणि भूमिगत गटारे मोकळी करण्यात आली.
आतापर्यंत 148 दुकानांचे ओटे आणि अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, सांडपाण्याचा निचरा मोकळा करणे आणि सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ही मोहिम आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार उपायुक्त त्र्यंबक कांबळे, सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख बी. सी. राठोड, सहायकप्रमुख सॅमसन कसबे यांच्यासह स्वच्छता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यारी राबवित आहे.
उघड्यावर मांस विक्री; 30 दुकाने हटवले
जालना शहर महानगर पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान उघड्यावर मांस विक्री करणारे सुमारे 30 दुकाने हटविण्यात आली आहे. गुरुवार, दि. 14 रोजी नूतन वसाहत परिसरातील चिकन-मटण विक्रीची 17 अवैध दुकाने व शेड हटविण्यात आले. तर शुक्रवार, 15 रोजी नूतन वसाहत, अंबड चौफुली आणि घाटी मार्गावरील 13 दुकाने हटविण्यात आली आहे. तर दोन दुकानांना महापालिकेच्यावतीने सील लावण्यात आले आहे.
मोहीम अजून तीव्र करणार ः आयुक्त शर्मा
शहरातील आतापर्यंत 148 अतिक्रमण निष्काशित करण्यात आले आहेत. उघड्यावर मांस विक्री करणारे दुकानंदेखील हटविण्यात आली आहे. भटक्या, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव होता. याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या. येत्या काळात मोहीम अधिक तीव्र करणार आहे.