

37,338 students will appear for the 12th-grade examination, while 32,433 students will appear for the 10th-grade examination.
जालना, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) दि.१० फेब्रुवारी ते दि.१८ मार्च तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) दि. २० फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सेवेतून निलंबित केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकार आशिमा मित्तल यांनी दिला आहे.
या संदर्भात सोमवार दि. २ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दहावी, बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने दक्षता समितीची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, पोलिस उपअधिक्षक रवींद्र निकाळजे, शिक्षणाधिकारी बाळू खरात यांच्यासह शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ३७ हजार ३३८ विद्यार्थ्यांसाठी ७९ परीक्षा केंद्र आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ३२ हजार ४३३ विद्यार्थ्यांसाठी १०२ परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोख व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यातील संवेदनशील बारावीच्या ८ तर दहावीच्या ४ अशा एकूण १२ परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार असून चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित केले जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. दहावी व बारावीच्या परी-क्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित केंद्र प्रमुखांना माझ्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा गैरप्रकार घडू देणार नाही, अशी सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्र संचालक उपस्थित होते.
बारावीसाठी ७९ तर दहावीसाठी १०२ परीक्षा केंद्र
जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परी-क्षेसाठी ७९ परीक्षा केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रावर सुमारे ३७ हजार ३३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ३२ हजार ४३३ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी सुमारे १०२ परीक्षा केंद्रे आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
१२ संवेदनशील केंद्रांवर ड्रोनचा पहारा
परीक्षा केंद्र परीसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या एकूण १२ संवेदनशील परीक्षा केंद्रासाठी वेगळ्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्हॉटसअॅप ग्रुपही तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. परीक्षेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या टॉप टेन केंद्र प्रमुखांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.