

350 Encroachments Demolished in 13 Days
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील नाल्यावर, रस्त्यावर बांधण्यात आ लेले ओटे, शेड हटविण्यात आले आहेत. शनिवार, दि. ९ पासून सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवार, दि. २२ तेराव्या दिवशी देखील सुरूच होती. या तेरा दिवसांत शहरातील विविध ठिकाणचे सुमारे ३५१ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे.
जनार्दन मामा चौक ते बस स्टैंड रोडवरील ३५ अतिक्रमणे हटवली दरम्यान, जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शकुवार, दि. २२ रोजी शहरातील जनार्दन मामा चौक ते बस स्टैंड रोडवरील एकूण ३५ अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहेत.
या कारवाईत मुख्य रस्त्यावरील आणि दुकानांसमोरील अनधिकृत ओटे, पायऱ्या आणि शेड तोडण्यात आले. तसेच नाल्यांवर केलेले अतिक्रमण हटवून नाले पूर्णपणे मोकळे करण्यात आले आहेत.
कारवाई जलद गतीने करण्यासाठी १ जेसीबी, १ टिप्पर आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. ही मोहिम अतिक्रमण प्रमुख बी. सी. राठोड यांच्या नेतृत्वाखाली शामसन कसबे (सहाय्यक), अमजद खान (लिपिक तथा स्वच्छता निरीक्षक), अजय पेम्बर्ती (लिपिक), शेख कादर (लिपिक), आमेर खान (लिपिक) आदींसह स्वच्छता विभागातील १० ते १२ सफाई कर्मचारी सहभागी झाले आहे. नाल्यावर करण्यात आलेले बांधकाम काढल्यामुळे नाले मोकळे झाले आहेत.
या ठिकाणी झाली अतिक्रमण हटाव कारवाई
जनार्दन मामा चौक ते बसस्टैंड रोड वरील ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली. सावरकर चौक ते बसस्टैंड रोडवरील ४०, जनार्दन मामा चौक ते सुभाष चौक तसेच सुभाष चौक ते उडपी हॉटेल परिसरातील ४५, जुना जालन्यातील भाजी मंडई परिसरातील सुमारे ७०, भोकरदन नाका पसिरातील १३, अंबड चौफुली ते इंदेवाडी पाण्याच्या टाकीपर्यंत ४ मांसविक्रीची दुकाने हटविली. नूतन वसाहत, अंबड चौफुली आणि घाटी रोड मार्गावरील मांसविक्रीची १३ दुकाने व २ दुकानांना सील लावण्यात आले.