

जालना : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जालना–छत्रपती संभाजीनगर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघातील एकूण ६३७ मतदारांपैकी जालना जिल्ह्यातील २२८ मतदार गुरुवार, दि. १८ रोजी आपला हक्क बजावणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत सदस्यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर येथे एकूण चार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकदीची खरी परीक्षा या निवडणुकीत होणार आहे.
महाविकास आघाडीला मतदान टिकविण्याचे आव्हान
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन शहरात महाविकास आघाडीकडे भाजपा शिवसेना शिंदे गट यांच्या युतीपेक्षा जास्त संख्याबळ असले तरीही प्रत्यक्ष मतदानादरम्यान महाविकास आघाडीला आपले संख्याबळ टिकविताना चांगलीच दमछाक होणार आहे. माजी आमदार चंद्रकांत दानवे व आघाडीचे नेत्यांसमोर आपले संख्याबळ टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्यापुढे महायुतीकडील मतदानापेक्षा त्यांच्या उमेदवाराला किती शिल्लक मते देता येतील, यासाठी प्रयत्न चालवले आहे.
नगरसेवकांचे मतदान असून एकूण 23 मतदानापैकी भाजपा आठ शिवसेना शिंदे गट एक व एक स्वीकृत सदस्य असे युतीकडे दहा मतांचे संख्याबळ आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे विद्यमान नगराध्यक्षांसह अकरा मतांचे तर काँग्रेसकडे दोन सदस्य असे महाविकास आघाडीकडे एकूण 13 मतांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडे आपली मते टिकून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जालना जिल्ह्याचे महत्त्व वाढले
एकूण ६३७ मतदारांपैकी २२८ मतदार जालना जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्याचा वाटा सुमारे ३६ टक्क्यांहून अधिक आहे. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय वर्चस्वाची चाचणी मानली जाते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रलंबित असल्याने यंदा नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीतील निवडून आलेले प्रतिनिधीच मतदान करणार आहेत. त्यामुळे जालना–छत्रपती संभाजीनगर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.