

आन्वा :सोशल मीडियाच्या बदलत्या दुनियेत सध्या ‘1980’चा ट्रेंड चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने स्वतःचे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो थेट 1980 च्या दशकातील वातावरणात असल्याप्रमाणे तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्याची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना आधुनिक तंत्रज्ञानातून नवा चेहरा मिळत आहे.
मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या विविध एआय फोटो एडिटिंग साधनांच्या मदतीने सध्याच्या फोटोचे रूपांतर जुन्या काळातील छायाचित्रासारखे केले जात आहे. त्यामध्ये त्या काळातील कपडे, हेअरस्टाईल, सायकल, जुन्या काळातील घरांची रचना, बाजारपेठ, वाहनांची शैली तसेच छायाचित्राचा जुना पोत यांचा वापर केला जात असल्याने फोटो पाहताना अनेकांना आपला भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहत आहे.
विशेष म्हणजे, केवळ तरुणाईच नव्हे तर जुन्या पिढीतील नागरिकही या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत. काही जण स्वतःचा तरुणपणीचा लूक तयार करून घेत आहेत, तर काही जण आई-वडील, आजी-आजोबा किंवा मित्रपरिवारासोबतचे 1980 च्या दशकातील काल्पनिक फोटो तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत.
एकीकडे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम हा ट्रेंड करत असताना दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान किती वेगाने बदलत आहे.
उत्सुकता वाढली
1980 च्या दशकातील साधी जीवनशैली, पारंपरिक पोशाख, जुन्या वस्तू आणि त्या काळातील वातावरण याबाबत आजच्या पिढीमध्येही उत्सुकता आहे. त्यामुळे एआयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या या छायाचित्रांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अनेक फोटो व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर शेअर होत असून त्यावर कमेंट्स आणि प्रतिक्रिया उमटत आहेत.