

परतूर : कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करावे लागणाऱ्या भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘जागर शिक्षण उपक्रम सप्ताह’ यशस्विरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत 151 स्थलांतरित मुलांचा जवळच्या शाळांमध्ये प्रवेश करण्यात आला. यामुळे चिमुकल्या हातात कोयत्याऐवजी लेखणी येणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून परतूर, मंठा, घनसावंगी व अंबड तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर उसतोड कामगार, वीटभट्टी, दगडखाण, जिनिंग प्रेस कामगारांचे हंगामी स्थलांतर होते. या स्थलांतरात मुलांचे शिक्षण खंडित होत असल्याने त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वाटूर यांच्या वतीने प्रयत्न केल्या जात आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपासून ते माँ साहेब जिजाऊ जयंतीपर्यंत संस्थेने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांत बालक-पालकांच्या गृहभेटी, शाळाभिती, अभ्यासभिती, एकलकोंडेपणा व चिडचिडपणासारख्या समस्या ओळखून समुपदेशन करण्यात आले. पालकांचे देखिल समुपदेशन करण्यात आले.
स्थलांतरित व भटक्या कामगारांच्या मुलांना जवळच्या शाळांत दाखल करून शैक्षणिक साहित्यांचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमाची परतूर व घनसावंगी तालुक्यांत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. पाटोदा परिसरात या उपक्रमाचा समारोप झाला.
यावेळी मुख्याध्यापक महादेव काळे, शिक्षक दीपक डोंगरे, चंद्रकांत तेलंगे, अंगणवाडी सेविका अर्चना मुंढे, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. शिक्षणाशिवाय मानवी विकास शक्य नाही. फुले दाम्पत्यांनी जुन्या रूढी-परंपरांना छेद देत समतेसाठी कार्य केले. त्याच विचारांवर प्रेरित होऊन ‘जागर शिक्षण’ उपक्रम सुरू केला आहे.’
एकनाथ राऊत, अध्यक्ष, आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वाटूर