गुरू- शिष्यात लढत पक्की; तिसरा भिडू येणार कोण? वसमत मतदार संघात इलेक्शन फिव्हर

Assembly Election : वसमत मतदार संघात इलेक्शन फिव्हर, करेक्ट कार्यक्रमाची चर्चा
Maharashtra Legislative Assembly election
गुरू- शिष्यात लढत पक्की; तिसरा भिडू येणार कोण? File Photo
Published on
Updated on
भीमराव बोखारे

वसमत : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून मतदार संघात मोर्चेबांधणी केली जात आहे. महायुतीकडून अजित पवार गटाचे राजू पाटील नवघरे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे गुरू-शिष्यात लढत निश्चित झाली आहे. परंतु, वसमत मतदार संघात तिसरा भिडूही या दोघांना भिडणार असल्याने तो भिडू नेमका कोण वाबाबत मात्र अद्यापही उलगडा झाला नाही.

वसमत विधानसभा मतदार संघात यंदा दांडेगावकर यांच्यासाठी अस्तित्वाची तर आमदार नवघरे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विद्यमान आमदार राजू पाटील नवघरे यांनी अजित पवार गटाला जवळ केले. तर दांडेगावकर यांनी मात्र शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. वसमत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्याने यंदा प्रथमच गुरू शिष्यात लढत पहावयास मिळणार आहे.

महायुती व महाविकास आघाडीतून इतरही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, दोन्हींकडून उमेदवार निश्चित झाल्यात जमा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीतून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच तिसरा भिडू जन्मास येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू यांच्या महाशक्तीकडून ऐनवेळी उमेदवारी पदरात पाडून घेण्याची शक्यता तिसऱ्या भिडूकडून व्यक्त होऊ लागली आहे. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी कोणत्याही प्रकारे वसमत विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच चंग बांधला आहे. चापके यांनी बंडखोरी केल्यास त्याचा नेमका फटका कुणास बसणार यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून इच्छुक असलेले मुनीर पटेल यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत पटेल यांनी वंचितकडून नशीब आजमावले होते. यंदा त्यांची नेमकी काय भूमिका राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपकडूनही अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला तांभाळे, मिलींद यंबल, अंकुश आहेर या नावाचा समावेश आहे. या तिन्ही पैकी एक उमेदवार महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करेल अशी चर्चा देखील रंगत आहे. एकीकडे महायुतीमधील घटकपक्षाच्या इच्छुकांकडून बंडखोरीची भीती पक्षश्रेष्ठींना वाटत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस व ठाकरे गटातील एखाद्या उमेदवाराकडून बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सध्यातरी महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना बंडखोरीच्या भीतीने ग्रासले असल्याचे चित्र आहे.

करेक्ट कार्यक्रमाची चर्चा

वसमत विधानसभा मतदार संघात मागील पंधरा दिवसांपासून यंदा करेक्ट कार्यक्रम, जिंकून कसा येतो तेच बघतो, मला उमेदवारी पक्की..., लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हालाच, गुलाल तयार ठेवा या आणि अशा आशयाच्या पोस्टमुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमशान सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम व इतर प्लॅटफॉर्मवर प्रचाराच्या पोस्ट, रिल्सचा पाऊस अन् कर्मेटचे धबधबे कोसळत आहेत. सोशल मीडियातून मतदारांची भावनिक साद घालण्याचा प्रयत्नदेखील केला जात आहे.

Maharashtra Legislative Assembly election
Assembly Election | चिंचवडमध्ये भाजपच्याच विजयाची बॅनरबाजी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news