

बार्शी : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी ‘उबाठा’ शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कारी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून शासनाकडे कर्जमुक्तीसह हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री आ. दिलीप सोपल, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, मिलिंद नार्वेकर, संभाजीराजे शिंदे, नंदकुमार काशीद, प्रवीण काकडे, विकास जाधव, दिनेश नाळे, रजनी पाटील, श्रीराम घावटे, आनंद घावटे, आबा घोंगडे, रामलिंग बसवंत, नाना घावटे, पांडुरंग घोलप यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून बिहारमध्ये प्रचारासाठी भटकत आहेत. त्यांनी घराकडे अर्थात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करू नये. शेतकरी आसमानी संकटाशी लढले, पण आता त्यांना त्यापेक्षा कठीण असलेल्या सरकारच्या सुलतानी संकटाशी लढावे लागत आहे. सरकार कर्जमुक्ती करण्यास टाळाटाळ करत आहे. दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई देऊ, असे सांगणारे नुसतं पंचांग काढतात. मुहूर्तामागून मुहूर्त काढतात. मात्र मदतीच्या नावाने ठणठणाट आहे. आ. दिलीप सोपल म्हणाले की, या तालुक्यातील 11 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. एका मंडळात चार वेळा अतिवृष्टी झाली. शेतात पाणी बाहेर न पडल्याने पीक कुजले. खा.ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत. सरकार काय करते आहे, याचा सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा.