

Two people were brutally attacked by a gang in Vasmat.
वसमत, पुढारी वृत्तसेवा : येथील शहरपेठ भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शहरपेठ भागात नारायण सर्जेराजे हा त्याची दुचाकी घेऊन गेला होता. यावेळी दुचाकी आणण्याच्या कारणावरून त्याचा त्याच भागातील दोघांसोबत वाद झाला. त्यानंतर नारायण याने त्यांच्या मित्रास बोलावून घेतले.
त्यामुळे वाद वाढतच गेला. शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी सुरु झाली. यामध्ये दोघांनी नारायण व गणेश यांच्या पोटात तसेच पाठीवर खंजीरने वार केले तसेच अन्य एकाच्या डोक्यातही वार केले. यामध्ये गणेश व नारायण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, दिनेश म्हात्रे, अजय पंडीत, इमरान कादरी, सुरेश जाधव, गुहाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस येत असल्याचे लक्षात येताच मारहाण करणाऱ्या दोघांनी पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी गणेश व नारायण जागीच कोसळले होते. शिवाय रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. पोलिसांनी जखमी दोघांनाही तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी शेख शाहरुक शेख कलीम यांच्या तक्रारीवरून सात जणांविरूद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बोडले करीत आहेत. या घटनेमुळे वसमत शहरात खळबळ उडाली असून, शहरात वाढत चाललेल्या टोळीयुद्ध आणि धारदार शस्त्रांच्या वापरावर नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.