

Liquor Sale Prohibition Kalamnuri
कळमनुरी : कळमनुरी शहर व तालुक्यात देशी दारूच्या दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे मद्यपानाचे प्रमाण वाढत आहे. याचा गंभीर परिणाम कुटुंबव्यवस्थेवर होत असून अनेक घरे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने देशी दारू दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
देशी दारूची खुलेआम विक्री व दुकानांची वाढ यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत असून त्यांच्या संसारावर याचा विपरीत परिणाम होत आहे. हा मुद्दा गांभीर्याने घेत शिवसेना व शिंदे गटाच्या वतीने शेकडो महिलांच्या सहभागाने हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात महिलांनी आपल्या संसारातील अडचणी, व्यथा व वेदना उघडपणे मांडल्या.
या आंदोलनात नगराध्यक्षा आश्लेषा चौधरी, राजेंद्र शिखरे, माजी नगराध्यक्षा सुवर्णा गाभणे, माजी पंचायत समिती सभापती अनिता खुडे, राणी विलास शिंदे, आर. आर. पाटील, शिवराज पाटील, अॅड. विश्वनाथ चौधरी, बबलू पत्की, फहीम नाईक, बाळू उर्फ गजानन पाटील, मयूर शिंदे, शेख शकील, शमशेर अली खान, किशोर भालेराव, अय्याज पठाण, फारूक पठाण, विनोद बांगर, शैलेश उबाळे, रवि शिंदे, शेख आवेस, सतीश खरजुले, बेले, कैलास पारवे, विलास शिंदे यांच्यासह महिला शिवसैनिक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने सामान्य महिला सहभागी झाल्या होत्या.
हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला असता उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना निवेदन देण्यात आले. शहर व तालुक्यातील देशी दारूची दुकाने तात्काळ बंद करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच दारूबंदीबाबत जनमत जाणून घेण्यासाठी “आडवी-उभी बाटली” निवडणूक घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.