औंढा नागनाथ : औंढा नागनाथ येथील वगरवाडी नागेशवाडी दरम्यान सुरू असलेल्या बांधकामाच्या पुलाच्या खड्ड्यांत काल रात्री अंदाज न आल्याने दुचाकीवरून जात असताना तिघेजण पडले. या आपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. महादा हरी रोडगे ( वय ५० वर्ष, राहणार जाभंरुण ), गजानन ग्यानदेव गाडे (वय ३५ वर्षे, राहणार रीधोरा), जनार्दन प्रल्हाद पुरी (राहणार पार्डी, ता. शेनगाव) अशी जखमींची नावे आहेत.
औंढा नागनाथ येथे वगरवाडी नागेशवाडी दरम्यान राज्य महामार्ग विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येथे पुलाचे बांधकाम चालू आहे. काल गुरूवारी (दि.१९) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महादा हरी रोडगे, गजानन ग्यानदेव गाडे, जनार्दन प्रल्हाद पुरी हे आपल्या दुचाकीने प्रवास करत होते. याच दरम्यान बांधकाम चालू असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने सरळ पुलाच्या खड्ड्यांत पडले. तिघेजण आणि दुचाकी लोखंडी रॉड, गजामध्ये अडकली. गज वाहन चालकाच्या शरीरात घुसल्याने त्यांला गंभीर दुखापत झाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे पथकासह अपघात स्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना तात्काळ औंढां नागनाथ येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आलं आहे.
रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम संत गतीने चालू असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र, मूग गिळून बसला आहे. अशी नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.