

जवळा बाजार : महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी असोसिएशन मान्य ५२ वी कुमारी राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील बोपखेल येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत हिंगोली जिल्ह्याचा कुमारी गटातील १९ वर्षांखालील मुलींचा संघ सहभागी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे निवड झालेल्या खेळाडूंच्या चार दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बाराशिव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडले. संस्थेचे सहसचिव प्रा. गजानन मुळे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता कातोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
या संघाचे प्रशिक्षण कार्य प्रशिक्षक ऋषिकेश हलगे हे करणार असून, खेळाडूंच्या तांत्रिक आणि शारीरिक क्षमतांना अधिक धार देण्यासाठी विशेष सराव सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. चार दिवस चालणाऱ्या या शिबिराला परवानगी हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. नवनाथ लोखंडे यांनी दिली.
शिबिरावेळी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कोपले, अशोक दाडगे, प्रा. डॉ. सूर्यकांत जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख शितल दशरथे, मंगल वाटोडे आणि अजिंक्य कुलकर्णी उपस्थित होते.
बाराशिव शिक्षण संस्थेतर्फे खेळाडूंच्या निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत हिंगोली जिल्ह्याच्या मुली उत्तम कामगिरी करणार, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.