

The problem of power supply has forced farmers to stay awake at night.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकावर जिवापाड मेहनत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे त्यांच्या हातात काहीच आले नाही. खरिपात झालेला तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे परिसरातील विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. तरीही विजेअभावी सिंचनासाठी धडपड करावी लागत आहे. दरम्यान, शासनाने दिवसा वीज देण्याचे आश्वासन दिले. मात्र,अद्यापही रात्री पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक मदार खरीप हंगामावर अवलंबून असते. गेल्या काही वर्षांपासून एकही हंगाम शेतकऱ्यांना साथ देत नाही. परिणामी, कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. निराशा झटकून शेतकरी प्रत्येक हंगामात मेहनत करून उत्पन्न काढण्यावर भर देत आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यातून वाचलेले सोयाबीन हाती आले.
पहिल्या कापसाच्या वाती झाल्या तर वे चणीला महाग झाला आहे. आता रब्बीसाठी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे, सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी हरभरा, गहू, कापूस, तुर पिकाला पाणी देण्याची धडपड करत आहेत. विद्युत असुविधेमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रबी हंगामातील पिकांना सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पिकांना पाणी देण्यावर भर देत आहेत. दुसरीकडे, दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री शेतात जागरण करावे लागत आहे. दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी सद्यस्थितीत एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्री असा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा रात्री पाणी देण्याची वेळ आली आहे.
रात्री पाळीत थ्रिफेज वीज पुरवठा होतो. सध्या गव्हाचे शेत भिजवणे चालू आहे. सध्या बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे. त्यात साप, विंचू आदींचा सामना करत रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे लागते, असे शेतकरी प्रकाश सावळे यांनी सांगितले.