

The development of Hingoli district has not gained the expected momentum
हिंगोली : गजानन लोंढे
राज्यात महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ वगळता मागील दहा वर्षापासून युतीचे सरकार कार्यरत आहे. परंतू, अद्यापही जिल्ह्याच्या विकासाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. हिंगोलीला राज्यमंत्री पदाच्या रूपाने लाल दिवा मिळेल अशी अपेक्षा मागील वर्षभरापासून व्यक्त होऊ लागली आहे. परंतू, प्रत्यक्षात मात्र एकालाही मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही. केवळ मंत्रिमंडळ विस्तारात हिंगोलीला लाल दिवा मिळेल अशी चर्चाच झडत असते. प्रत्यक्षात मात्र लाल दिव्यापासून हिंगाली वंचित राहिल्याने विकासाची गतीही धिमी झाली आहे.
1995 च्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या रूपाने जिल्ह्याला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले. त्यानंतर 2004 मध्ये आघाडी सरकारमध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांच्या रूपाने जिल्ह्याला राज्यमंत्रीपद मिळाले होते. डॉ. मुंदडा व दांडेगावकर यांना पालकमंत्रीपद देखील त्या काळात मिळाले होते. परिणामी, जिल्ह्याच्या विकासाला बऱ्यापैकी चालना मिळाली होती.
2009 नंतर मात्र एकदाही जिल्ह्याला मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही. वसमतचे आमदार राजु नवघरे यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडीच वर्षानंतर मंत्री करू असा शब्द दिला होता. परंतू, अजित पवार यांचे निधन झाल्याने हा विषय काहीसा थांबला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भविष्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या बदलात किंवा विस्तारात आमदार नवघरे यांना संधी देतात काय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्रीपदासाठी आपली इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आमदार बांगर यांना भविष्यात मोठी संधी देऊ असा शब्द अनेक सभांमधून दिल्याने भविष्यात आमदार बांगर यांना मंत्रीपद मिळेल असा दावा आमदार बांगर - यांचे समर्थक वारंवार करीत आले आहेत. तर हिंगोलीतून सलग तिसऱ्यांदा विजय संपादन करीत हॅट्रीक साधलेल्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांना देखील मंत्रीपदाची अपेक्षा असून पक्षश्रेष्ठी आमदार मुटकुळे यांना भविष्यात संधी देतील असे बोलले जात आहे. एकूणच जिल्ह्यातील तीनही आमदार महायुतीत असल्याने तिघांपैकी एकाची वर्णी मंत्रीमंडळात लागू शकते.
असे राजकीय जाणकार सांगू लागले आहेत. मंत्रीमंडळाची खांदेपालट किंवा फेरबदल येत्या काही काळात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या फेरबदलात हिंगोलीच्या आमदारांना संधी मिळाल्यास हिंगोलीसाठी हक्काचा पालकमंत्री देखील मिळणार आहे. परंतू, सातत्याने मंत्रीपदाच्या चर्चा झडत असल्या तरी हिंगोलीला मागील 16 वर्षापासून मंत्रीपदाने कायम हुलकावणी दिली आहे.
जिल्ह्याच्या नशिबी कायम इतर जिल्ह्यातील पालकमंत्री लादण्यात आला. हिंगोलीच्या पालकमंत्र्यांचा इतिहास पाहता डॉ. मुंदडा, दांडेगावकर यांनाच संधी मिळाली. त्यानंतर मात्र हिंगोलीला हक्काचा पालकमंत्री मिळालाच नाही. महाविकास आघाडीच्या काळात वर्षा गायकवाड त्यानंतर शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी हिंगोलीचे पालकमंत्रीपद सांभाळले. सध्याचे पालकमंत्री झिरवाळ तर सर्वच बैठका ऑनलाईन घेत आहेत. हिंगोलीत येण्याची देखील तसदी घेत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, विकासाची गती मंदावली आहे.