

Ceiling of the hexagonal hall of the Zilla Parishad damaged
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या अनेक कामांवर अनेक आक्षेप घेतले जातात. परंतु, अधिकारी व गु ोदारांच्या मिलीभगतमुळे कामाचा दर्जा सुमार असतो. आता तर चक्क जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहाच्या छताचे सिलींग वर्षाच्या आतच गळून पडल्याने सामान्य नागरिकांसमोर निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना आला आहे.
मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकहाती हुकूमशाही असल्यासारखी गत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने अनेक कामांमध्ये हात धुवून घेतले जात असल्याचा प्रकार घडत आहे.
वर्षभरा पूर्वीच जिल्हा परिषदेचे महत्वाचे सभागृह असलेले षट्कोनी सभागृहाचे लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. परंतु, या कामाचा दर्जा राखण्यात अधिकाऱ्यांना यश आले नाही. आपल्या मर्जीतील गुत्तेदाराला काम दिल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत. मंगळवारी षट्कोनी सभागृहातील छताचे सिलींग अनेक ठिकाणी कोसळले. विशेष म्हणजे सभागृहातील व्यासपीठावरील मोठा भाग खाली गळून पडला.
ज्या जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्ह्यात अनेक विभागाकडून कामे केली जातात. त्याच जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत होणारी इतर कामे कशी असतील असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र बांधकाम विभाग कार्यरत आहे.
या बांधकाम विभागाचे अधिकारी नूतनीकरणाच्या कामाकडे लक्ष देऊन नव्हते काय असा प्रश्नदेखील उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच जिल्हा परिषदेत सध्या अनागोंदी सुरू असल्याची चर्चा आहे. लाखो रुपये खर्च करून षट्कोनी सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम बांधकाम विभागांतर्गत करण्यात आले. परंतु, या बांधकामाचा फज्जा उडाल्याचे मंगळवारच्या घटनेवरून समोर आले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची हिंमत जिल्हा परिषद प्रशासन दाखवेल काय असा सवाल उपस्थित होउ लागला आहे.
जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग मागील वर्षभरापासून चांगलाच चर्चेत आला आहे. ठराविक गुत्तेदारांच्या कामाकडे कानाडोळा करून एकप्रकारे निकृष्ट कामांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप सामान्य जनतेमधून होऊ लागला आहे. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषदेतील काही बड्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप देखील होऊ लागला आहे. एकूणच काही ठराविक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या कामांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी शासनाच्या कोट्यवधींच्या निधीला चुना लागत आहे.