

Farmers will get Rs 119 crore as crop insurance
उमरी, पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षातील खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी उमरी तालुक्यातसह नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला असून ११९ कोटी रुपये १५ जूनपर्यंत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भगवान मनुरकर यांनी दिली आहे.
अवकाळी व अवेळी झालेल्या पावसाने मागील वर्षातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा अहवाल ऑनलाइन पंचनामा सादरा केला.
ज्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, अशाच उमरी तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, डॉ. भगवान मनुरकर यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन पिकविमा मंजूर करण्या संदर्भात चर्चा केली. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी पाठपुरावा केला. त्या दृष्टीकोनातून ११९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून १५ जूनपासून शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉ. मनूरकर यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे रब्बी हंगामातील मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हरभरा, केळी, तीळ, आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी पिकाचे नुकसान झाल्याचे जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकरी ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा कंपनीकडे पीकविमा भरतात. परंतु पीकविमा कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे पीकविमा भरूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही वेळा पीकविमा मंजूर होतो. परंतु तो तुटपुंजा असल्याने बहुतांश शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहतात. मागील खरीप हंगाम आणि यंदाच्या रब्बी हंगामातील झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी. अन्यथा पीकविमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डा. मनूरकर यांनी दिला आहे.