

Storm Impact on Farmers Fruit Garden Crop Damage
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा, जवळा पांचाळ, सर्कलमध्ये आज (दि. ९) सायंकाळी ६.३० ते ७ .०० वाजता अचानक सुसाट वारा सुरू झाला. त्यामुळे बागायती पिके, केळीसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आखाडा बाळापूर, वारंगाफाटा , डोंगरकडा, जवळा पांचाळ परिसरातील रेडगाव, वडगाव, दिग्रस बुद्रुक, दांडेगाव, रामेश्वर, गुंडलवाडी, सुकळी वीर, या परिसरामध्ये केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आज अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. या वाऱ्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या कापणीसाठी तयार झालेल्या केळी पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले.
याबरोबर भाजीपाला व आंबा, संत्रा, मोसंबी, लिंबू ,पपई या फळबागांचेही या वाऱ्यांमध्ये नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहे. वाऱ्यामुळे गावातील, शेतातील घरावरील व आखाड्यावरील पत्रे उडून गेली. सोलार संचचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाच्या सऱ्या सुरू होत्या. शेतातही आणि गावात वाऱ्यामुळे खूप नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. रात्री आठ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला असून शहरी व ग्रामीण भागातील वीज पुरवठा बंद झाला आहे.