

SP takes to the field for law and order Municipal elections at hingoli
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरासह वसमत व कळमनुरी नगरपालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेसाठी खुद्द पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मैदानात उतरले असून बुधवारी त्यांनी हिंगोली शहरातील विविध प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. निवडणुकीच्या कालावधीत अनुचित प्रकार घडत असल्याचे दिसून येताच तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
हिंगोली शहरासह वसमत व कळमनुरी पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार घडू नयेत यासाठीही पोलिस विभागाकडून गस्त घातली जात आहे.
त्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, सहायक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, गंधकवाड, श्रीधर वाघमारे, नागरे यांचे सह ८ पोलिस पेट्रोलिंग वाहने व क्युआरटी पथक हिंगोली शहरात तैनात करण्यात आले आहे.
त्यानंतर खुद्द पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली शहरातील बियानी नगर, रिसाला बाजार, रिसाला नाका, मेहराजुलुम चौक, सिध्दार्थ नगर, खुशाल नगर, जिजामाता नगर, निरंजन बाबा चौक, वंजारवाडा, एनटीसी, शिवर-ाजनगर, नगर परिषद वसाहत, आजम कॉलनी, हनुमान नगर, गारमाळ, पोस्ट ऑफिस चौक, अंबिका टॉकीज परिसर, महात्मा गांधी चौक या भागात भेटी देऊन नागरीकांशी संवाद साधला. निवडणुका खुल्या व निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या व कोणत्याही मदतीसाठी हिंगोली पोलिस दल २४ तास सतर्क असल्याचे सांगितले. नागरिकांनीही यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची माहिती घेऊन त्यानुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना हिंगोली शहर पोलिसांना दिल्या. या सोबतच शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.