

Suregaon Instagram video case
औंढा नागनाथ : इंस्टाग्रामवर महिलेचा व्हिडिओ शेअर का केला? याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुरेगाव येथील तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सुरेगाव येथे घडली. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत बुधवारी (दि.5) उशिरा चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथील नारायण श्रीरामे यांनी एका महिलेचा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ शेअर केला होता, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेचा नातेवाईक असलेल्या मावेश ढेंबरे हे बुधवारी सायंकाळी जाब विचारण्यासाठी गेले असता गावातील नारायण श्रीरामे, धनंजय पोले, अभिषेक पोले, द्रुपद पोले यांनी मावेश यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या मारहाणीमुळे मावेश घाबरून गेला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली असता त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी आली. यावेळी चौघांनी त्यांना बेदम मारहाण केला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मावेश ढेंबरे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी नारायण श्रीरामे धनंजय पोले, अभिषेक पोले, द्रुपद पोले यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजतात चौघेही फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पोलीस उपाधीक्षक राजेंद्रकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकाळ पुढील तपास करीत आहे.