

Sales of dry fruits increased due to severe cold
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिवाळ्याचे आगमन होताच शहरात थंडीचा कडाका वाढला असून, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुका मेव्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, बाजारात सुका मेव्याच्या दरांमध्ये सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
थंडीमध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड आणि खारीक खरेदी करत आहेत. या वाढलेल्या मागणीचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. जीएसटीत साधारणपणे १० टक्केपर्यंत दर कमी झाले आहे. मात्र, मागणीत वाढ व आवक कमी असल्याने त्याचा दरवाढीवर परिणाम होतो.
व्यापाऱ्यांच्या मते, नवीन माल बाजारात येईपर्यंत आणि मागणी स्थिर होईपर्यंत ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. वाढलेल्या दरांमुळे थंडीत रोजच्या आहारात सुका मेव्याचा समावेश करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुका मेव्याच्या दरात वाढ झाली आहे. थंडी सुरू होताच लाडू बनविण्याची लगबग महिलांमध्ये सुरू आहे. याच थंडीच्या लाडूचे बजेट यंदा महागाईमुळे वाढले आहे.
काजू ८०० रुपये किलो, खारीक १५० ते ३०० रुपये किलो, बदाम ८०० रुपये किलो, आक्रोड ७०० किलो, डिंक ४०० रुपये किलो, गोंडबी १४०० रुपये किलो, मेथी ८० रुपये किलो, अमरावती साखर ७० रुपये किलो, खोब्रा ३५० रुपये किलो, मनुका ५०० रुपये किलो, ग्रीन पिस्ता १२०० रुपये किलो, गूळ ५० रुपये किलो प्रमाणे सुका मेव्याची विक्री होत आहे.