

Six dead dogs were pulled out of a fire department water tank
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयाच्या अग्निशमन दलाच्या पाण्याच्या टँकमधून चक्क सहा दगावलेले कुत्रे बाहेर काढण्यात आले आहे. दुर्गंधी सुटल्यानंतर टँकमधे पाहणी केल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येथील शासकिय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित केल्यानंतर रुग्णालयाचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ही अपेक्षा फोल ठरू लागली आहे. रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा सोडाच पण साध्या तातडीच्या आरोग्य सुविधा मिळणेही कठीण झाल्याचा आर ोप रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे.
रुग्णालयाच्या मोठ्या इमारतीमध्ये डॉक्टरांचा शोध घेताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अग्रिशमन दलाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. या शिवाय तातडीने पाणी उपलब्ध होण्यासाठी सुमारे एक लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचा टँक उभारण्यात आला आहे. मात्र या टैंकला झाकणच बसविण्यात आले नाही.
त्यामुळे धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या टँकमधून दुर्गंधी सुटत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता टँकमधील पाण्यात कुत्रे दगावलेले दिसून आले. त्यानंतर तातडीने धावपळ करून या टैंकमध्ये स्वच्छता कर्मचारी उतरवून पाहणी केली असता त्यात एक दोन नव्हे तर तब्बल सहा कुत्रे मृत झालेले दिसून आले. त्यानंतर या पाण्यातून लहान मोठे सहा कुत्रे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टँकमधील पाणी काढून नव्याने पाणी भरण्यात आल्यानंतरच दुर्गंधी कमी झाली. या प्रकारानंतर झाकण बसवण्यात आली.
या प्रकारामुळे रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा बव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात मोकाट जनावरांचा तसेच मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने एखादे वेळी गंभीर प्रसंग घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.