

Sengaon Municipal Council
सेनगाव : नगरपंचायत नगराध्यक्ष मनिषा देशमुख यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दि.30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केल्याने सेनगाव नगराध्यक्ष पदासाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने चालू पंचवार्षिक कार्यकाळातील उर्वरित सव्वा वर्षांच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी (दि. ५) नगरपंचायत सभागृहात दोन उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. ठाकरे गट शिवसेनेतर्फे यमुनाबाई देशमुख तर भारतीय जनता पार्टीतर्फे मीराबाई खाडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून दोन्ही नामनिर्देशन पत्रे वैध ठरविण्यात आली आहेत.
येत्या ९ जानेवारी रोजी सेनगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नामनिर्देशन प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या उपस्थितीत पार पडली.
सध्याच्या पंचवार्षिक कार्यकाळात ज्योतीताई देशमुख (उबाठा गट शिवसेना), गायत्री देशमुख व मनीषा देशमुख (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी सव्वा-सव्वा वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला आहे. आता उर्वरित सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक होणार आहे.
सेनगाव नगरपंचायतीतील राजकीय बलाबल पाहता भाजपाचे ५, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, उबाठा गट शिवसेनेचे ५ तर काँग्रेसचे २ नगरसेवक आहेत. दरम्यान, या संपूर्ण कार्यकाळात भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत कायम राहिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.