

हिंगोली : आरळ ते तेलगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २३) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. एका दुचाकीवरील कंदुरीच्या कार्यक्रमासाठी नेण्यात येणारा बकरा उसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील नांदुसा येथील नितीन नरवाडे व कपील हटकर हे गुरुवारी सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर बकरा घेऊन परभणीकडे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी वसमतपासून काही अंतरावर असलेल्या आरळ ते तेलगाव मार्गावर आले असताना दुचाकीवरील बकऱ्याने अचानक उसळी मारली. यामध्ये दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् दुचाकी परभणीकडून बऊर (ता. कळमनुरी) कडे जाणाऱ्या दुचाकीवर आदळली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चार जण रस्त्यावर आदळले.
या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार ताम्रध्वज कासले, किशोर कौठेकर, किरण धोतरे, प्रितम चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौघांनाही तात्काळ उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून नितीन नरवाडे (२५, नांदुसा, जि. नांदेड) व शेख सिराज (३५, रा. बऊर ता. कळमनुरी) यांना मृत घोषित केले.
दरम्यान, कपील हटकर व शेख सिराज यांच्या पत्नीवर उपचार केले जात आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत नितीन व शेख सिराज यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून सायंकाळी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.