

Jawala Bazaar Republican Sena roadblock
जवळा बाजार : जवळा बाजार येथे औंढा नागनाथ रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज (दि.१८) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या जन सुरक्षा कायद्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
हा कायदा सर्वसामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क धोक्यात आणणारा आहे. या कायद्यांतर्गत जर शासनाला वाटले की एखादी व्यक्ती अथवा संघटना समाजाच्या स्वास्थ्यास धोका पोहोचवत आहे, तर त्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा नोंदवलेला नसतानाही तिला तुरुंगात टाकण्याचा अधिकार शासनाला मिळतो. त्यामुळे, हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.
विधान परिषदेचे आमदार व माजी खासदार हेमंत पाटील यांनी विधिमंडळातील भाषणात एससी व एसटी समाजाला अर्बन नक्षलवादी असे संबोधले. त्यामुळे सर्व अनुसूचित जाती व जमातीच्या भावना दुखावल्या असून, त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केले. यावेळी प्रा. भिमानंद काळे (युवा जिल्हा कार्याध्यक्ष), कैलास मामा जोंधळे (जिल्हाध्यक्ष), दिनेश हनुमंते, वैभव धबडगे, दिनाची खाडे, रवि दिपके (जिल्हा उपाध्यक्ष), करण फुंदसे (युवा तालुका अध्यक्ष), निवृत्ती नरवाडे (वसमत तालुका अध्यक्ष), प्रकाश गव्हाणे, नागेश दातार, राजेंद्र वेडे, संदीप राठोड, पप्पू गायकवाड, अर्जुन ढेंबरे, भागवत ढेंबरे, जगन धबडगे, पंडित श्रीखंडे, अनिल खिल्लारे आदी भीमसैनिक उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष पंडित सूर्यतळ यांनी केले.